छातीतला चिखुल आणि पराभवाच्या चिखलात विरोधक

आ.भारत भारत भालके यांच्या एका सभेने बदलला नगरपालिका निवडणूक निकाल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

2011 सालच्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एकतर्फी जिंकू असा विश्वास असलेल्या आ.परिचारक यांच्या आघाडीला पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्या पराभवाचे कारण ठरली होती.आमदार भारत भालके यांची शिवतीर्थावर झालेली विराट सभा. त्या सभेत पंढरपूर शहराची बकाल अवस्था सांगणारे ‘ धुळीमुळे छातीत चिखुल झाला ‘ हे वाक्य लोकांच्या कानात असे काही बसले की सत्ताधार्यांना पराभवाच्या चिखलात रुतून बसावं लागलं.

2011 सालची पंढरपूर नगरपालिका निवडणूक अतिशय संस्मरणीय झाली होती. अनेक दशके पालिकेत असणाऱ्या परिचारक गटाने निवडणुकीची तयारी जोमात केली होती. गोरक्षण संस्थेच्या मैदानात परिचारक गटाच्या पहिल्या सभेतच निवडणूक जिंकल्याचा माहोल होता. खात्रीने नगरसेवक होऊ या अपेक्षेने परिचारक गटाकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती.

तर दुसऱ्या बाजूला मागील काही दशकात 5 ते 6 च्या वर नगरसेवक निवडून न आलेल्या विरोधकांमध्ये ताळमेळ नव्हता. आ.भारत भालके, कल्याणराव काळे, काँग्रेस पक्ष यांच्या विठ्ठल परिवाराने तीर्थक्षेत्र विकास आघाडी उभा केली मात्र या आघाडीत सुरुवातीपासून धुसफूस होती. अगदी बैठकीच्या चहापाण्याचे पैसे कुणी द्यायचे इथपासून ते उमेदवार कोण असावेत इथपर्यंत या आघाडीत खडाजंगी झाल्याशिवाय एकमत होत नव्हते.

त्यातच आम.भारत भालके निवडणूक हातघाईवर आली असताना आजारी पडले. रात्रीतच त्यांचा रक्तदाब कमालीचा खालावला, अत्यवस्थ अवस्थेत त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. तिथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना इकडे विरोधकांनी अगोदर आ.भालकेनी आजारी पडण्याचे नाटक केल्याचे आरोप करून त्यांच्या आजारपणाची थट्टा चालवली. काही दिवसांनंतर आता भालके परत येत नसतात अशाही अफवा सोडल्या. त्यामुळे अगोदरच बेदिली असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्यकर्ते पार खचून गेले होते.

भीमा सहकारी चे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी आपल्या निवडणूक कौशल्याने आव्हान उभा करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या जोडीला भगीरथ भालके यांनी कोपरा सभा, वार्डात पदयात्रा काढून निवडणूक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. तिकडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या भारत नानांची प्रकृती सुधारत गेली आणि काही दिवसांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. निवडणूक प्रचारात सामील होण्यासाठी उतावीळ असलेल्या भारत नानांना रोखण्याचा प्रयत्न केला जात होता.

मात्र शेवटच्या सभेला तरी उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करीत भारत नाना शिवतीर्थावरील सभेला येणार अशी खबर कार्यकर्त्यांना, शहरातील नागरिकांना लागली. आणि कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला, शहरातील वातावरण बदलत गेले. शिवतीर्थावर झालेल्या प्रचंड गर्दीने निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांच्या आरोग्याबाबत उठलेल्या अफवा, केलेली थट्टा, शहरातील ज्वलंत प्रश्न, नागरिकांच्या असंख्य तक्रारी, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, झोपडपट्टी, उपनगरी भागातील मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा, यासह असंख्य प्रश्नांवर त्या विराट सभेत आ.भारत नानांनी टीकेचा भडिमार केला.

नानांच्या एकेका शब्दांवर व्यक्त होणारी गर्दी सभेचा जल्लोष वाढवत होती. शहरातील रस्त्यांची अवस्था सांगताना त्यांनी एकच वाक्य उच्चारले की, ‘धुळीमुळे छातीत चिखुल झालाय’ हे वाक्य शहरातील नागरिकांनाही एवढं वास्तव वाटले की, नगरपालिका निवडणुकीचा निकलच बदलला. आ.भारत नाना भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने शेवटच्या क्षणी मुसंडी मारत 33 पैकी 18 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे ज्या भागात कधी एक नगरसेवक निवडून येत नव्हता त्या प्रभागात 5 नगरसेवक निवडून आले. मंदिर परिसरातील ज्या बुथवर विरोधी आघाडीला कधी 50 , 100 मते मिळत नव्हती त्या बुथवर 400, 500 मतांची गोळाबेरीज लागली.

पंढरपूर शहरातील परीचारकांच्या वर्चस्वाला, वोट बँकेला सुरुंग लागला. तिथून पुन्हा 2016 ला परिचारक गटाने जरी सत्ता परत मिळवली असली तरी शहरात भारत नानांचा वाढता प्रभाव रोखता आलेला नाही. 2014आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परीचारकाना शहरात मानहानीकारक धक्के सहन करावे लागले आहेत. विरोधकांना पराभवाच्या चिखलात ढकलून देणाऱ्या शिवतीर्थावर झालेल्या त्या सभेची आजही नागरिक आठवण काढतात आणि छातीतील चिखलावर अनेकवेळा चर्चा करीत बसतात.

Leave a Reply

error: Content is protected !!