आ. भारत भालके चळवळीचा भक्कम आधार होते

पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी : पंढरपूरकरांनी सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त केलेल्या भावना

पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘आ. भारत भालके म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं… जिथे जातील तिथे मंत्र्यापेक्षाही अधिक गर्दी जमा करणारे सेलीब्रेटी होते…  मतदार संघातील प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडित एक हक्काचा माणूस होता…  सर्व जाती-धर्मांना सन्मान देऊन आपुलकीने वागणारा कुटुंबप्रमुख होता… लढवय्या योद्धा आणि परिवर्तनवादी चळवळीचा भक्कम आधार होता… हा नुसता व्यक्ती नव्हता, तर तो एक विचार होता… आणि हा विचार आता पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’, अशा शब्दात पंढरपूरकरांनी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ.भारत भालके यांचे आकस्मित निधन झाले.  पंढरपूरकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री संत तनपुरे महाराज मठात शोकसभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, नगराध्यक्ष साधना भोसले, मर्चंटस बँकेचे चेअरमन नागेश भोसले, प्रणव परिचारक, काँग्रेसचे ता.अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, ‘दामाजी’चे चेअरमन समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, श्रीकांत शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, सागर यादव, श्रमिक मुक्ती दलाचे मोहन अनपट, ‘विठ्ठल’चे व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, शिवसेनेचे साईनाथ अभंगराव, नगरसेवक कृष्णा वाघमारे, प्रा. तुकाराम मस्के, सतीश देशमुख, दिपक वाडदेकर, समाधान फाटे, अर्जुन चव्हाण, सुभाष भोसले, संदीप केंदळे, विवेक परदेशी, ओंकार जोशी, डॉ. प्राजक्ता बेणारे, श्रेया भोसले, गणेश अंकुशराव, दिलीप देवकुळे, राजेश भादुले,  स्वागत कदम, आबा शिंदे, शिवाजी शेंडगे आदींसह शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ.भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ पोरका झाला आहे. आता भगीरथ भालके यांनीच खंबीरपणे पुढे यावे. मतदारसंघ आणि विठ्ठल परिवाराचे पालकत्व स्वीकारावे. आ. भालके यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वांनी साथ देऊन भगीरथ भालके यांना बिनविरोध विधानसभेत पाठवावे, अशा भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या.

आपल्या भावना व्यक्त करताना बळीराम साठे म्हणाले, आ. भालके हे स्वतःचे नेतृत्व स्वतः निर्माण करणारे खंबीर नेते होते. त्यांनी कधी कुणाचा मत्सर केला नाही. गोरगरिबांना आपुलकीने वागवणारा, सर्वांना जीव लावणारा असा नेता पुन्हा होणार नाही.  अभिजित पाटील म्हणाले, आ.भालके यांनी स्वतःच्या हिमतीवर कारकीर्द गाजवली. त्यांच्या वाटचालीतून तरुण पिढीला खूप शिकायला आणि लढायला बळ मिळते. बसमाधान आवताडे म्हणाले, राजकारणात हार-जीत होत असते. मात्र आम्ही कधीही एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली नाही. आ. भालके यांचे संकल्प पूर्ण करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

प्रणव परिचारक म्हणाले, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर तीन वेळा आमदार झालेल्या भालके यांच्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. दिलीप धोत्रे म्हणाले, दीनदलित, वंचित, गोरगरीब जनतेचे आ.भालके कुटुंबप्रमुख होते. प्रत्येक कुटुंबाला आपला वाटणारा हा नेता जाण्याने फार मोठी हानी झाली आहे.  गणेश पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करणारा असामान्य नेता म्हणजे आ. भालके होते. एखाद्या कुटुंबातील उमदा तरुण गेल्यानंतर जी अवस्था असते, तिच अवस्था आ.भालके यांच्या निधनाने पंढरपूर, मंगळवेढ्याची झाली असल्याचे कृष्णा वाघमारे यांनी नमूद केले. 

यावेळी भावना व्यक्त करताना श्रीकांत शिंदे यांना व्यासपीठावरच रडू कोसळले. सामान्य, गरीब कार्यकर्त्याला मोठं करणारा नेता आज आपल्यात नसल्याचे आभाळाएवढे दुःख झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित सर्वच जनसमुदाय भावनाविवश झाल्याचे चित्र दिसून आले. 

Leave a Reply

error: Content is protected !!