झंझावात शांत झाला !

आ.भारत भालके यांचा जीवनसंघर्ष संपला.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सरकोली (ता.पंढरपूर ) येथील भीमा -माण नदीच्या संगमावरून सुरू झालेला लाल मातीतला आणि राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील एक झंझावात आज ( दि.28 रोजी ) अखेर शांत झाला. झुंझार, दिलदार, आणि गोर गरिबांचा कैवारी आम.भारत भालके यांची जीवन-मृत्यूशी सुरू असलेली लढाई आज संपली. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये रात्री साडे बारा वाजता आ.भालके यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एका संघर्षाची अखेर झाली असून संपूर्ण पंढरपूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील आ.भालके समर्थक हजारो नागरिकांनाही अनावर दुःख झाले आहे.

30 ऑक्टोबर रोजी आ.भालके यांना कोरोना ची लागण झाली होती.त्यातून ते बरे झाले. मात्र नंतर त्यांना किडनीविकार आणि, डेंग्यू या आजाराने ग्रासले. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र वरचेवर त्यांची प्रकृती खालावत गेली. दोन दिवसांपासून त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले तरीही त्यांच्या प्रकृतीने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सायंकाळपासून त्यांची तब्येत खालावत गेली. शुक्रवारी दुपारपर्यंत प्रकृती जैसे थे होती. अखेरीस आज मध्यरात्री डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

2009 पासून पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेले आ.भालके यांची राजकीय कारकीर्द श्री विठ्ठल सहकारी साखर करखाण्याच्या संचालक पदापासून सुरू झाली. लहानपणापासून लाल मातीची ओढ असलेल्या भालके यांनी कुस्त्यांचे मैदान गाजवले तसेच राजकीय मैदानात भल्या भल्या राजकीय आसामिना अस्मान दाखवले. 2004 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. मात्र 2009 साली अपक्ष उभा राहून भालकेनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या बलाढ्य उमेदवारास पराभूत केले. त्यानंतर 2014 साली काँग्रेस कडून लढताना प्रशांत परिचारक तर 2019 साली विधानसभेची हॅट्ट्रिक करताना राष्ट्रवादी च्या उमेदवारीवर त्यांनी सुधाकरपंत परिचारक यांनाही पराभूत केले होते.

तळागाळातील लोकांशी असलेला थेट संपर्क, लोकांच्या सुख दुःखात सामील होण्याचा त्यांचा स्वभावगुण त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होय. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सत्तेत आणि सत्तेच्या बाहेर राहूनही संघर्ष केला. पंढरपूर शहर, तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले, तसेच मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना, पिण्याच्या पाण्याची योजना, संत, महंतांची स्मारके, अनेक गावचे रस्ते, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना त्यांनी मार्गी लावल्या. सर्व सामान्यांसाठी प्रसंगी कायदा हातात घेण्यासही ते कधी घाबरले नाहीत. म्हणूनच 2014 च्या मोदी लाटेत, पंढरीत नरेंद्र मोदींची सभा होऊन ही आम. भालके विजयी झाले होते.

अबाल वृद्धांचे, युवकांचे आणि माय बहिणींचा ‘ नाना ‘ आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाची जेमतेम 60 वर्षे पूर्ण करीत असताना भालके यांनी समाजमनावर अमीट छाप सोडली असून त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रचंड संघर्ष वाट्याला आला आणि अखेरीपर्यंत ते सर्व आघाड्यावर संघर्ष करीत राहिले. राज्याच्या विधानसभेत केवळ 11 वर्षात धडाडीचे लोकप्रतिनिधी म्हणून आ.भालके यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्याने एक झुंजार राजकारणी गमावला आहे, तर पंढरपूर, मंगळवेढ्याच्या जनतेने आपला लाडका नाना गमावला आहे. आम.भालके यांच्या निधनाने पंढरपूर, मंगळवेढा हे दोन्ही तालुके राजकीय दृष्टीने पोरके झाले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याने एक झुंजार नेता अकाली गमावला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!