सोलापूर : ईगल आय मीडिया
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी असतील असा दावा काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. सोलापुरातील कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिंदे समर्थकांतून समाधान व्यक्त होत आहे. विश्वजीत कदम यांच्य विधानाने उपस्थित शिंदे समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत केले. विश्वजीत कदम सोलापुरात आढावा बैठकीसाठी आले होते.
यावेळी पुढे बोलताना ना. कदम म्हणाले की, आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रीमंडळात नाहीत याची खंत वाटत आहे. कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील असा दावा कदम यांनी केला.
वडील सुशीलकुमार शिंदे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री असूनही प्रणिती यांनी राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी, मोठा लोकसंपर्क, आक्रमकता, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य या बळावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र काँग्रेस पक्षाने त्यांना एकदाही मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही.