शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकले
टीम : ईगल आय मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे आणि मोदी सरकारची ही सर्वात मोठी आणि पहिलीच शरणागती असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याला पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार सह देशाच्या अनेक भागात मोठा विरोध झाला होता. शेतकरी रस्त्यावर उतरले होते. दिल्लीच्या रस्त्यावर शेतकरी गेल्या 11 महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. मोदी सरकारने हे कायदे रेटून नेत आंदोलन दडपून टाकण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र शेवटी भाजप सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले आहे.
आज गुरू नानक जयंतीच्या मुहूर्तावर मोदींनी देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या महिना अखेर होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात रीतसर प्रक्रिया पार पाडली जाईल आणि हे कायदे मागे घेतले जातील असेही मोदी म्हणाले आहेत.
मोदी सरकारची ही मोठी पीछेहाट असून शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाले आहे.