देवाच्या दारात मोहोळ भाजपमधील दुहीचे ‘ दर्शन ‘

एकाच विषयावर, एकाच दिवशी, एकाच पक्षाची दोन स्वतंत्र आंदोलने

मोहोळ : ईगल आय मीडिया

पक्ष शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीची मोहोळ तालुक्यात राज्य सरकार विरोधात दोन वेगवेगळी आंदोलने पार पडली. त्यापैकी एका गटाने मोहोळ येथील श्री नागनाथ महाराजांना आर्त साद घालली. तर दुसऱ्या गटाने श्री दत्त मंदिरात साकडे घातले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे राज्यातील मंदिरे भाविक भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहर व तालुक्यात देखील शनिवारी भाजपच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र गेल्या आठवड्यात पदाधिकारी निवडीवरून मोहोळ तालुका भाजपमध्ये उभी फूट पडली असून दोन गट आमने-सामने उभे राहिले आहेत.
त्यापैकी एका गटाने मोहोळ चे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या बंद मंदिरासमोर भजन करून घंटानाद आंदोलन केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटातून अवघ्या जगाला वाचव आणि राज्यातील तिर्थक्षेत्रे, मंदिरे, मस्जिदी आदी धार्मिक स्थळे तात्काळ खुली करण्यासाठी राज्य सरकारला चांगली बुद्धी दे! असे साकडे घालण्यात आले. यावेळी नागनाथ मंदिराचे मुख्य पुजारी राजेंद्र खरगे महाराज, युवा मोर्चा ता. अध्यक्ष अजय कुर्डे, सरचिटणीस रमेश माने, शहराध्यक्ष सुरेश राऊत, महेश चेंडगे, तानाजी दळवे, संजीव खिलारे, प्रदिप लाळे, रामदास झेंडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपच्या दुसर्‍या गटाने नूतन तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहरातील दत्त मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, महेश सोवनी,भाजपचे नेते संतोष पाटील, संजय क्षीरसागर, सतीश पाटील, लक्ष्मण तात्या कृपाळ, श्रीकांत शिवपुजे,मुजूप मुजावर, अमोल चोरगे, कासीम मुल्ला,औदुंबर वाघमोडे, दीपक गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान, राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीने या आंदोलनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर वंचित बहुजन आघाडी ने कडाडून टीका केली आहे.


वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या वतीनेे 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीच खर्‍या विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे ढोंगी भाजपने श्रेय घेण्यासाठी हे आंदोलन नौटंकी आंदोलन केले आहे.
– राजेंद्र आवारे
ज्येष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply

error: Content is protected !!