मोहोळ तालुक्यातील टायर रिमोल्डिंग दुकान आगीत जळून खाक
टीम : ईगल आय मीडिया
कामती ( ता.मोहोळ ) येथील टायर व रिमोल्डिंग दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किट झाल्याने मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक गावच्या शिवारात ही घडली. सोलापूर महानगर पालिकेच्या अग्निशमक पथकाचे आग आटोक्यात आणली.
याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कामती बुद्रुक येथे जावेद सय्यद यांचे टायर आणि रिमोल्डिंगचे दुकान आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्कीट झाल्याने दुकानाला भीषण आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्याने दुकान मालकांनी दुकानातील टायर व इतर रिमोल्डिंग साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीत दुकानातील लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले.
जावेद सय्यद यांनी सोमवारीच जवळपास तीस लाख रुपयांची नवीन टायर खरेदी केली होती आणि त्या टायरंपैकी अजून एकही टायर विक्री झालेली नव्हती. या घटनेची माहिती मिळताच कामतीचे सपोनि किरण उंदरे यांनी घटनास्थळी पोहोचले.
आगीची तीव्रता लक्षात घेता सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलास पाचरण करण्यात आले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.