वीज कनेक्शन तोडणी विरोधात जनहितचा मोहोळ येथे रास्ता रोको

मोहोळ : ईगल आय मीडिया


महावितरण प्रशासनाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशाने सुरू केलेली वीजतोडणी मोहीम स्थगीत करावी. या सह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश दिल्याने महावितरण प्रशासनाने राज्यभर वीज तोडणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे उन्हाळ्यात वीज कनेक्शन अभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांनी वीज कनेक्शन तोडणी आदेश स्थगित करावा, घरगुती व शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, अवकाळी पाऊस महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी इत्यादी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. मात्र याबाबत प्रशासन स्तरावर दखल न घेतल्याने जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली.


आज ( गुरुवार १८ मार्च )रोजी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोहोळ येथे सोलापूर-पुणे महामार्गावर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको आंदोलनात जनहित चे पदाधिकारी व मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!