टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अवघड गुटख्याचा टेम्पो बुधवार २४ नोव्हेंबर रोजी मोहोळ पोलिसांनी पकडला. यावेळी पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अफसर मझहर सय्यद (वय ३५ वर्षे, रा. उल्लाल उपनगर बेंगलोर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हा गुटखा कर्नाटकातून गुजरात मध्ये नेला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला अवैध गुटखा मोहोळ शहरातून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, पोलीस नाईक प्रविण साठे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर, कॉ. सिध्दनाथ मोरे यांच्या पथकाने चिखली गावच्या शिवारात सोलापूर-पुणे महामार्गावर सापळा लावला होता.
यावेळी मोहोळ कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्र के.ए. ०१ ए.के ४५२२ ) पोलिसांनी पाठलाग करुन थांबवून चौकशी केली. यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध कंपन्यांचा अवैध गुटखा मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी तब्बल १७ लाख ०६ हजार चारशे रुपये किंमतीच्या गुटख्यासह एकुण ३० लाख ०६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टेम्पो चालकाला गजाआड केले.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालक अफसर मझहर सय्यद (वय ३५ वर्षे, रा. उल्लाल उपनगर बेंगलोर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.