रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश…
मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ पोलिस ठाण्याच्या सबजेल मध्ये विविध गुन्ह्यात अटक असलेल्या १३ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.मोहोळ पोलिस ठाण्याच्या सबजेलमध्ये विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेले एकुण २० आरोपी आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मोहोळ पोलिस ठाण्याच्या सबजेलमध्ये एकुण २० आरोपी आहेत. त्यांपैकी ३ आरोपींना थंडी, ताप, सर्दीचा त्रास सुरु झाल्याने पोलिस प्रशासनाने तात्काळ त्यांना उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांची रॅपीड अँन्टीजन टेस्ट केली असता, तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी मंगळवार ९ मार्च रोजी त्यांच्या संपर्कातील उर्वरीत १७ आरोपींची सबजेलमध्ये रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १० आरोपी कोरोना पॉझिटिव्ह तर ७ जण निगेेटिव्ह आले त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आरोपींची संख्या १३ इतकी झाली आहे. यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे.
सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १३ आरोपींवर सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनामार्फत पोलिस स्टेशन व जेल परिसर सॅनिटाईज करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.