कोविड हेल्थ सेंटर अभावी मोहोळ तालुक्यात ‘ब्रेक द चेन’ लाच “ब्रेक”

आठ दिवसात कोविड सेंटर सुरु न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा

मोहोळ : ईगल आय मीडिया


मोहोळ तालुक्यातील सामान्य नागरिकाला कोविडचे उपचार घेण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली असून ऑक्सीजन बेडसाठी देखील वण वण करावी लागत आहे. जिल्हा प्रशासन मात्र मनुष्यबळाचे कारण पुढे करत मोहोळ तालुक्यातील प्रस्तावित कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याच्या मुद्यावर झोपी गेले आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना संख्या आणि मृतांचा आकडा पाहून सामान्य नागरिकांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात कोविड हेल्थ सेंटर सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कोरोना उपचार घेणारे रुग्न्नी दिला आहे.


मोहोळ तालुक्यात कोरोना स्थिती फारच गंभीर आहे. शेटफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० बेडचे कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. मात्र एम.डी अथवा फिजिशियन डॉक्टर नसल्यामुळे हे सेंटर सुरू करण्यास अडचण आहे. जिल्हा प्रशासन या संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम असून आमचाही पाठपुरावा सुरू आहे.


गणेश मोरे
गट विकास अधिकारी पं.स. मोहोळ


मोहोळ शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लादून ‘ब्रेक द चेन’ ची अंमलबजावणी केली आहे. मोहोळ तालुक्याची लोकसंख्या पाहता तालुक्यात किमान प्रत्येकी ५० ऑक्सीजन बेडची दोन वेगवेगळी कोविड हेल्थ सेंटर सुरु होणे अपेक्षीत आहे. मात्र तालुक्यात शासनाचे कोविड हेल्थ सेंटरच नाही. सध्याची कोरोना स्थिती पाहून प्रशासनाने मोहोळ शहरातील एका क्लिनिकला DCHC (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) ला मान्यता दिलेली आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सामान्य नागरीकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे महाग झाले आहे.


कोरोनामुळे मोहोळ तालुक्यातील सामान्य नागरिक देशोधडीला लागला आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे म्हणजे मरणच विकत घेतल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने मोहोळ तालुक्यात प्रस्तावित कोविड हेल्थ सेंटर करावे. अन्यथा आम्हाला आमरण उपोषण मार्ग अवलंबावा लागेल.

कोरोना रुग्ण मोहोळ


गतवर्षीची कोरोना स्थिती पाहता, मोहोळ तालुका आरोग्य विभागाने गेल्या वर्षीच शेटफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र अद्याप पर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. गेल्या चार महिन्यात मोहोळ तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २७९८ इतका झाला असून १२० रुग्णांचा बळी गेला आहे. तरीही प्रस्तावित कोविड हेल्थ सेंटर का (?) सुरु होत नाही. हे न उलगडलेले कोडे आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!