महिन्याभरात सीना नदीला चौथ्यांदा पूर

मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; वीज पडून जनावरे ठार तर अनेक घरांची पडझड

टीम : ईगल आय मीडिया
मोहोळ तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने धुवादार बॅटिंग केल्याने फळबागा सह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून एका ठिकाणी वीज पडून जर्शी गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरावर दोन समित्या नेमल्या असून पंचनामे सुरू असल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी दिली.


गेल्या दोन दिवसांपासून मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. महसूल विभागाच्या नोंदीनुसार मोहोळ तालुक्यात ५ ऑक्टोंबर सकाळी सात वाजे पर्यंत २०.५५ मि.मी. च्या सरासरीने एकुण १६४.४ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे महिन्याभरात चौथ्यांदा सीना नदीला पूर आला असून नदीकाठच्या शेती पिकात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर सीना नदी वरील कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. येणाऱ्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेती पिकांचे व फळबागांच्या नुकसानासाठी तसेच घरांच्या पडझडीच्या पंचनाम्यासाठी दोन वेगवेगळी पथके नेमले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तजवीज ठेवली आहे.
– प्रशांत बेडसे-पाटील
तहसीलदार मोहोळ

सोमवारी संध्याकाळ पासून वादळी वारा व मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे कोण्हेरी गावात वीज पडून प्रकाश बाबु तूप समिंदर या शेतकऱ्यांची जर्सी गाई मृत्युमुखी पडली आहे. तर बिभीषन अंबादास शेळके व अजिंक्य पांढरे यांच्या घरांची पडझड झाली आहे. तर पेनुर गावातील रफिक शेख यांच्या डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोहोळ शहरालगत पंढरपूर रोडवर असलेल्या एका शेतकऱ्याचा ऊसाचा फड जमीनदोस्त झाला आहे. तालुक्यातील अन्य गावात देखील फळबागा व शेती पिकाच्या नुकसाना बरोबरच घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याच्या घटना घडल्या असून अद्यापर्यंत त्यांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले असून शेती पिकाच्या नुकसानाच्या पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक तर घरांच्या पडझडीच्या पंचनाम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व जि.प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांचे पथक अशी एकूण दोन पथके नेमली आहेत. त्यांच्या पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले जाणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!