चंद्रभागेत बुडून 3 मुलांसह आईचाही मृत्यू

अधिक मासानिमित्त निर्माल्य अर्पण करण्यासाठी गेल्यानंतर अमरावती जिल्ह्यात घडलेली दुर्घटना

टीम : ईगल आय मीडिया

चांद्रभागेत पोहोण्यासाठी गेलेली तीन मुले बुडताना त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आईचाही नदीत बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील निंभोरा राज ( ता. धामणगाव ) येथे आज ( रविवारी) घडली. यश चवरे (१३), जीवन चवरे(१४), सोहम झेले (१२) पुष्पा चवरे अशी मृत माय लेकरांची नावे आहेत. अधिक मास एकादशी निमित्त केलेल्या पूजेचे साहित्य अर्पण करण्यासाठी आई गेली होती. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत.

आज अधिक मास एकादशी होती. निंभोरा येथील पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पूजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या चंद्रभागा नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तिन्ही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी नदीपात्रा जवळ उभ्या असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. यामध्ये त्या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


निभोंरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नदीत अवैध रित्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, नदीच्या पात्रात पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात बुडून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

One thought on “चंद्रभागेत बुडून 3 मुलांसह आईचाही मृत्यू

Leave a Reply

error: Content is protected !!