राऊत -फडणवीस भेटीमुळे राज्य सरकारला काही फरक नाही

सुशांतसिंग प्रकरणी सी बी आय ने काय दिवे लावले ? : खा. पवार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खा. संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट मुलाखत घेण्यासंदर्भात होती. त्यामुळे त्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे योग्य नाही. राज्य सरकार ला त्यामुळे काही अडचण येणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे आल्यानंतर आ. भारत भालके यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हाच त्यांनी इतरही नेत्याच्या मुलाखती घेनार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत -फडणवीस भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहणे योग्य नाही, असेही पवार म्हणाले. खा. उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे हे दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत आहेत. त्यांनी भाजपकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा असे आवाहनही यावेळी केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ने एन डी ए मध्ये यावं असं आवाहन केले आहे. याकडे लक्ष वेधले असता, खा. पवारांनी आठवले यांच्या पक्षाचा एक तरी आमदार खासदार आहे का, त्यामुळे ते काही बोलले तरी त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही असे सांगितले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, सुशांत सिंहची आत्महत्या राहिली बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. चौकशी करणाऱ्या यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका घेण्यासारखी अवस्था आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही वाचलं होतं की एका कलाकारांनी आत्महत्या केली.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र केंद्र सरकारचा त्यांच्यावर विश्वास दिसत नाही म्हणून त्यांनी हा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही. त्यामुळे आता भलतीकडेच सगळं चाललंय. सत्य कधी बाहेर येईल त्यावेळेला कळेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!