परीक्षा नियोजित वेळेस घेण्याची मागणी
टीम : ईगल आय मीडिया
राज्य सरकाने mpsc परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त होत असून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच सोशल मीडियावर ही सर्व स्तरातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना सोशल मीडियावर प्रथमच तुफान ट्रोल केले जात असून mpsc चा ट्रेंड ट्विटरवर चालू आहे.
नियोजित वेळेप्रमाणे एमपीएससीची परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज अचानक घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कित्येक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष भाजपनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हणत महाविकास आघडी सरकारवर टीका केली.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पडसाद पुणे जळगाव, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केला. येथे विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकात जमत रास्ता रोको केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
नागपूर, सांगलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संताप
सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विध्यार्थी आणि विद्यार्थीनी अपस्थित होत्या.
दरम्यान राज्य सरकाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी परीक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली.