37 कामगार कामावर होते : आग विझवण्याचे काम सुरू
टीम : ईगल आय मीडिया
मुळशी येथील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.
या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
याबात अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत 41 कामगार होते, आता त्यापैकी १७ जण कंपनीत अडकले आहेत.
ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता.
दरम्यान, मुळशीचे तहसीलदार अशोक धुमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. अजूनही भीषण आग लागलेल्या या कंपनीत १५ ते २० कामगार अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी कंपनीच्या भिंती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.