मुंबईत काँग्रेसची ‘भाई’ गिरी !

मुंबईच्या अध्यक्षपदी आ.भाई जगताप यांची नियुक्ती

टीम : ईगल आय मीडिया

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक अर्जुनराव जगताप अर्थात भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप या मराठी चेहऱ्याची निवड काँग्रेसने केली आहे. त्याच बरोबर बिगर मराठी कार्याध्यक्ष नियुक्त करून परप्रांतीय मतदारांनाही लक्ष्य केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. यांपैकी अध्यक्षपदी सूत्रं अखेर भाई जगताप यांच्याकडे गेली आहेत.

दरम्यान, इतर इच्छुकांनाही काहीना काही पदं देण्यात आली आहेत. यांपैकी मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आ. भाई जगताप हे स्वच्छ प्रतिमेचे, स्पष्ट वक्ते, मराठी तसेच अन्य भाषिक मतदारांवर ही त्यांचा चांगला प्रभाव आहे. पक्षात त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेस पक्ष मजबूत होईल,असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतो आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!