मुंबईत पावसाचे 33 बळी

दरडी कोसळल्या, भिंती ढासळल्या : विजेच्या धक्क्याचे गेले जीव

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. मुंबई आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर ऊन होते. पावसाची फारशी चिन्हे दिसत नव्हती; परंतु रात्री ११ वाजता चित्र बदलले. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

रात्री १२ वाजल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. १२ ते २ या वेळेत मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान,  मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



मुंबईतील सर्वच भागांत दीडशे मिमीहून अधिक पाऊस पडला, तर काही भागांत २०० मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस दहिसरमध्ये पडला. दहिसर – २४५.८४ मिमी, चेंबूर – २४१.०५ मिमी, विक्रोळी पूर्व – २३७.९८ मिमी, कांदिवली – २३२.४१ मिमी, मरोळ – २२८.८५ मिमी, मुलुंड – २२७.५५ मिमी, सीएसएमटी स्थानक परिसर – २२२.७४ मिमी बोरिवली – २२२.२३ मिमी वरळी – २२१.७१ मिमी

चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले.

भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. अंधेरीतील फिरदोस बेकरीचा मालक असलेल्या तरुणाचा दुकानातील साहित्य वाचवताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर पोईसर येथील घटनेत एक जण दगावला. वांद्रे रेक्लेमेशन येथे ४५ वर्षांच्या एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

हिंदमाता, सायन रोड नं. २४, गांधी मार्के ट, वडाळा चर्च, सक्कर पंचायत चौक, नायर रुग्णालय परिसर, वडाळा संगमनगर, मडके बुवा चौक , वरळी, ग्रँटरोड, नाना चौक या भागांत पाणी साचले, तर पूर्व उपनगरात शीतल चित्रपटगृह, शेल कॉलनी, आरसीएफ वसाहत, अंजनाबाई नगर, अणुशक्ती नगर, कु र्ला आगार, शेरे पंजाब कॉलनी, मानखुर्द रेल्वे स्थानक, नेहरू नगर, स्वस्तिक चेंबर, कल्पना सिनेमा, टेंबी ब्रिज हे भाग जलमय झाले. पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज, साईनाथ सबवे, मिलन सबवे, अंधेरी सबवे, अंधेरी मार्के ट, दहिसर सबवे, वांद्रे टॉकीज, वीरा देसाई रोड अंधेरी, वाकोला पूल, गोरेगाव बेस्ट वसाहत येथे पाणी साचले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!