मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना कंगना म्हणते ” बाबर सेना “

पाकव्याप्त काश्मीर असा पुन्हा मुंबईचा उल्लेख केला

टीम : ईगल आय मीडिया

विना परवाना केलेले बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ” बाबर सेना ” असा अवमानकारक उल्लेख करतानाच मुंबईलाही पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीर म्हणून अभिनेत्री कंगना राणावतने आपला उद्दामपणा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

मागील आठवड्यात मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या जुहू येथील विना परवाना बांधकाम असलेल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त करत पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे. तसंच पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा उल्लेख बाबरची सेना असा करीत आपला उद्दामपणा दाखवून दिला आहे.

महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने आज सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला.

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबर सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकार आणि सरकारमधील शिवसेनेला कंगणाने थेट आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने कंगना ला वाय प्लस सुरक्षा दिली असून कंगना आज मुंबईत येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!