मुंढे यांनी मुलांना डांबून ठेवल्याचा आरोप : उपोषणाचा दिला इशारा
टीम : ईगल आय मीडिया
महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण शमते न शमते तोच आता त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे मुंडेपुढे पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे.
मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा थेट आरोप मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा यांनी केला आहे. या मुलांमध्ये एक १४ वर्षांची मुलगीही असून ती सुरक्षित नाही, असेही पत्नीचे म्हणणे आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास येत्या २० फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषम करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आपण २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर गेले असताना आपल्याला मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून हाकलून दिले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नसून मुलांमध्ये १४ वर्षीय मुलगीही आहे. मात्र तिच्यासाठी कोणी केअरटेकरही नाही, असे म्हणत मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत असल्याचा गंभीर आरोपही करुणा यांनी केला आहे. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
करुणा यांनी फेसबुकवर देखील ही तक्रार केली आहे. त्या म्हणतात की, आज माझा वाढदिवस आहे. मात्र माझ्या पतीने गेल्या ३ महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट या बंगल्यात लपवून ठेवले आहे. त्यांना माझ्याशी बोलणे आणि भेटण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि हा राजकीय शक्तीचा दुरुपयोग आहे. इतका अत्याचार तर रावणाने देखील केला नसेल.
मला माझ्या मुलांना भेटू दिले गेले नाही, तर मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे करुणा यांनी म्हटले आहे. उपोषणासाठी त्यांनी चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करण्याची परवानगीही मागितली आहे. शेवटी मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.