दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर शिंगोटे यांचं निधन

मराठी पत्रकारितेत चमत्कार घडवणारे बाबा गेल्याने हळहळ

पुणे : ईगल आय मीडिया

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज गुरुवारी ( दिनांक सहा ऑगस्ट ) रोजी दुपारी एक वाजता त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुख वाडी ( तालुका जुन्नर ) येथे निधन झाले.
बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुरलीधर शिंगोटे यांचा प्रवास प्रेरणादायी
उपमुख्यमंत्री अजित पवार
‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर शिंगोटे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, जुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.

Leave a Reply

error: Content is protected !!