राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गादेगाव ( ता.पंढरपूर ) या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीत शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या नागेश फाटे यांनी मोठ्या कष्टाने उद्योग व्यवसायात उज्वल यश मिळवले आणि त्यांच्यातील उद्यमशीलता हेरून पक्षातील युवकांना प्रेरित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नागेश फाटे यांची थेट उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य आणि होतकरू युवकांना संधी देणारा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच नागेश फाटे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
नागेश फाटे हे गादेगाव या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतून आलेले शेतकरी सुपुत्र आहेत. स्वातंत्र्य सैनिकांची मोठी परंपरा असल्याने गादेगावात सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रात धाडसाने पुढे येणाऱ्या युवकांची ही मोठी परंपरा आहे. याच परंपरेतून नागेश फाटे यांच्यासारखे उद्योजक उभा राहीले आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नागेश फाटे यांनी ठेकेदारीची छोट्या स्वरूपात कामे करण्यास सुरुवात केली. एन पी कन्स्ट्रक्शन ही त्यांची कंपनी अल्पावधीतच नावारूपाला आली. ठेकेदारीच्या कामात नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांनी अधिक गुणवत्ता आणि किफायतशीरपणा जपला. उद्योगात प्रगती करीत असतानाच नागेश फाटे यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगती सुरू होती. गावचे उपसरपंच, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले, त्याच बरोबर गेल्या 4 वर्षांपासून ते सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम करीत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागेश फाटे यांच्या वर राष्ट्रवादी काँग्रेस उद्योजक आघाडीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले असून नागेश फाटे यांचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही अभिनंदन केले आहे तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी चे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी ही अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून नागेश फाटे यांचे अभिनंदन होत आहे.