टीम : ईगल आय मीडिया
नांदेड, परभणी जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. ढगफुटी सदृश्य पावसाने लोहा तालुक्यात नसरत सावरगाव येथे जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि त्यात दोन महिला वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे.
नांदेड जिल्ह्यात लोहा व परभणीतील पालम तालुक्यास काल ( दि.30 ) रोजी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नांदेडच्या इतर तालुक्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस झाला. लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला. या वेळी गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला. पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली आणि दाेन महिला वाहून गेल्या. त्या सख्ख्या जावा असून मणकर्णाबाई बापूराव दगडगावे (५२) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे (४५) अशी मृतांची नावे आहेत. लोहा तालुक्यातील मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगाव, चितळी, मुरंबी, सावरगाव आदी गावांत ढगफुटीसारखा पाऊस झाला.
नसरत – सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतातून बैलगाडीसह घराकडे येत होते. रस्त्यावर नदी ओलांडून येताना अचानक नदीला पुराच्या पाण्याचा लोट आला आणि बैलगाडी वाहून गेली. गाडीमध्ये अमोल, भाऊ विवेक, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापूराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाच जण होते.
त्यातील मणकर्णाबाई बापूराव दगडगावे व पार्वतीबाई संभाजी दगडगावे या दोघी पुराच्या पाण्यासह वाहून गेल्या. शोध घेतल्यानंतर मणकर्णाबाई यांचा हुलेवाडी पुलाजवळ तर पार्वतीबाई यांचा पेंडू (ता.पालम, जि. परभणी ) येथे मृतदेह सापडला. अमोल, विवेक, शिवमाला यांनी झाडाच्या फांदीला धरून आपला जीव वाचवला. तसेच बैलजोडीही वाहून गेली असून त्यांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.