पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात !

आषाढी यात्रेपूर्वी टप्पा ते वाखरी बाय पास मार्गाचे काम पूर्ण होणार

पंढरपूर : प्रतिनिधी
मोहोळ – पंढरपूर – देहू – आळंदी या राष्ट्रीय महामार्ग क्र.965 चे पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील टप्पा ते वाखरी या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसते. येेत्या आषाढी यात्रेपूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे.


मोहोळ ते पंढरपूर , पुणे मार्गे देहू आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 या नावे मंजूर आहे. या महामार्गासाठी भु संपादन प्रक्रिया चालू असून महामार्गाच्या निर्मितीचेही काम वेगाने सुरू आहे. पंढरपूर उपविभागातील पंढरपूर आणि मोहोळ या तालुक्यातील महामार्गाचे काम अतिशय वेगाने चालू आहे. या उपविभागातील पंढरपूर ते देगाव, देगाव ते आढीव, भटुंबरे, गुरसाळे, शिरढोन मार्गे वाखरी बायपास चेही भूसंपादन आणि प्रत्यक्ष महामार्गाचे बांधकाम ही काम सुरू आहे.

भूसंपादन मोबदला अदा करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. त्यामुळे आता महामार्गाचे काम विना अडथळा प्रगतीवर आहे,
मोहोळ तालुक्यातील काम 70 जवळपास टक्के पूर्ण झाले आहे तर पंढरपूर येथील बायपास चे काम ही वेगाने सुरू आहे. याच बायपास मार्गावर भीमा नदीवर सर्वात उंच पूल निर्माण होत असून या पुलाचेही काम सुरू झाले आहे. वाखरी ते पिराची कुरोली ( टप्पा ) या दरम्यान आषाढी यात्रा नजरेसमोर ठेऊन कामाला गती दिली आहे.

महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठे सहकार्य केले, त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया गतीने पार पाडता आली. पंढरपूर उपविभागातील राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. बायपास मार्ग मोठा असून या मार्गावरील मोठे उड्डाणपूल, भीमा नदीवरील पूल यांचीही कामे सुरू झाली आहेत. पालखी मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील टप्पा ते वाखरी बाय पास पर्यंतचे काम 80 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे. येत्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

श्री. सचिन ढोले, उपविभागीय अधिकारी, तथा भूसंपादन अधिकारी, पंढरपूर.

टप्पा ते वाखरी बायपास दरम्यान 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर असणारे ओढे, कालवे यावरील पूल उभारणीही सुरू आहे. टप्पा ते वाखरी बायपास दरम्यान महामार्गाचे काम 80 टक्केहून अधिक पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी मोठे पूल आणि घरांचे पाडकाम सुरू असल्याने मार्गाचे अपूर्ण पॅचेस राहिले आहेत, येत्या महिनाभरात ती कामे पूर्ण होऊन मे अखेर पंढरपूर तालुक्यातील टप्पा ते वाखरी बायपास पर्यंत च्या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे दिसते.

आगामी आषाढी यात्रेसाठी येणारा पालखी सोहळा नवीन महामार्गावरून यावा हे उद्दिष्ट समोर ठेऊन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी भु संपादन आणि महामार्ग निर्मितीला गती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांचे अंतर्गत वाद, विवाद स्वतः ढोले यांनी स्थळ पाहणी करून तडजोड घडवून आणत सोडवले आहेत. त्यामुळे पंढरपूर उपविभागीय क्षेत्रातील भूसंपादन बाबत चे वाद कोर्टात जाण्याचे प्रमाण ही अत्यल्प आहे.

पालखी सोहळा येण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे या हिशेबाने एकूणच उपविभागीय अधिकारी ढोले यांनी पाठपुरावा केल्याने महामार्गाचे काम युद्धपातळीवर गतिमान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला ही मिळाला आहे. यामुळे सध्या पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!