पोखरापूर येथील नवोदय विद्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
टीम : ईगल आय मीडिया
पोखरापूर ( ता.मोहोळ ) येथील नवोदय केंद्रीय विद्यालयाच्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शौचालयांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. देवानंद ज्ञानेश्वर भोसले ( वय 17 वर्षे,रा. मांगी, ता. करमाळा )असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज मृताच्या पालक व नातेवाईकांनी देवानंदचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोहोळ शहराच्या मेन रोडवर ठीय्या मांडला होता.
या बाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, देवानंद ज्ञानेश्वर भोसले हा विद्यार्थी पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता जेवणासाठी विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी घेत असताना देवानंद भोसले गैरहजर होता. त्यामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेच मिळून आला नाही.
मृत देवानंद भोसले हा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्यामुळे घटनास्थळी पंढरपूरचे प्रांताधिकारी, पोलिस उपाधीक्षक व मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी जवाहर नवोदय विद्यालयाचे केंद्रीय सचिव देखील जवाहर नवोदय विद्यालयला भेट देणार आहेत. दरम्यान देवानंद भोसले याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
एका शौचालयाचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात येताच, शिक्षकाने शौचालयात कोण आहे हे पाहण्यासाठी दरवाजा बाहेरून वाजवत आवाज दिला. मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकांनी नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य ना याची कल्पना देऊन मोहोळ पोलिसांना पाचारण केले. रात्री साडेआठ वाजता पोलीस आल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडला असता, देवानंद भोसले हा रस्सीच्या साह्याने गळफास घेऊन मृत झालेल्या अवस्थेत मिळून आला. त्यामुळे एकच गदारोळ उडाला.
या प्रकरणी जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र प्रसाद विष्णुपंत नाडगौडा यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहे.