यंदा तुळजापूरचा नवरात्र महोत्सव रद्द

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानीचा पारंपरिक नवरात्र महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. तुळजा भवानी देवीच्या पौराणिक परंपरेत प्रथमच हा महोत्सव रद्द होत असून कोरोना जागतिक महामारीचा फटका लाखो भाविकांच्या भावना आणि हजारो व्यापारी यांच्या खिशाला ही बसणार आहे.

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील सर्व देवस्थाने भाविकांसाठी बंद आहेत. कोरोना साथीमुळेच यंदा प्रथमच तुळजापुरातला चैत्री पौर्णिमा सोहळा स्थगित केला होता. त्या पाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 6 महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते.

17 ऑक्टोबरला घटस्थापना मुहुर्त
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 9 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबर सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे तर 17 ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापननेने नवरात्रास प्रारंभ होणार आहे. 25 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन तर 26 ऑक्टोबर उषःकाली सीमोल्लंघन सोहळा, त्या नंतर देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ हाेणार असल्याची माहिती आहे.

गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे. कोरोनाचा पहिला फटका चैत्र पौर्णिमेला बसला होता. नवरात्र महोत्सवही भाविकांशिवाय होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवात तब्बल 15 ते 20 दिवस शहरातील बहुतांश दुकाने 24 तास खुली असते. दिवस रात्र भाविकांची प्रचंड वर्दळ असल्याने सर्वांचा चांगला व्यवसाय होतो. नवरात्र महोत्सवाच्यानंतर दीपावलीच्या सुट्टीतही भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, यंदा नवरात्र महोत्सवच होणार नसल्याने भाविकांसह व्यापारी वर्गातूनही निराशा पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!