महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांची 8 महिन्यांची मेहनत
टीम : ईगल आय मीडिया
महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा तयार केला आहे. शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फुट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली असून हा पुतळा हुबेहुब आणि चित्तवेधक असल्याचे त्या म्हणाल्या.
1500 किलो धातूचा वापर
शरद पवार यांच्या पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना हा पुतळा साकार करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. हा पुतळा साकारण्यासाठी शिंदे या दररोज १० तास काम करत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबर या दिवशी शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी येथील शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.’
शरद पवार यांचा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार शिंदे यांनी पवार यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी आतापर्यंत अनेक शिल्प साकारली आहेत. त्यांच्या वर्कशॉपमध्ये असलेले राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बालशिवाजी यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात.