राष्ट्रवादीला फाजील आत्मविश्वास नडला


स्व.भालके यांच्याविषयी ची सहानुभूती दिसून आली : भाजपला ‘लक्ष्मी’ पावली


पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांचा विजय झाला आहे. आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.प्रशांत परिचारक यांची खंबीर साथ, पैशाचा पाऊस याच्या जोरावर येथे भाजपचे कमळ फुलले आहे. दिवंगत आम.भारत भालके यांच्या विषयी असलेली सहानुभूती मतदारांनी 1 लाख 5 हजारांवर मतदारांनी दाखवून दिलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा फाजील आत्मविश्वास नडला, आणि शेवटच्या दोन दिवसात उमेदवार ‘कमी ‘ पडला. केवळ त्यामुळेच राष्ट्रवादी ला आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे.


आ.भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्याविषयी सहानुभूती ची लाट होती. सामान्य मतदारांच्या मनात अजूनही त्यांच्या नेतृत्वाचे गारुड कायम आहे. उमेदवार भगीरथ भालके यांना मिळालेली 1 लाख 5 हजार 717 मते ही या सहानुभूती मुळेच मिळालेली आहेत ही बाब विरोधकांना ही नाकारता येत नाही.

विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अगोदर या मतदारसंघात एकास एक लढत देण्याची कल्पना मांडल्यानंतर पुढची गणिते जुळवण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले. पंढरपूर शहर आणि तालुक्यात असलेली आम.परिचारक यांची यंत्रणा, राजकीय ताकद समाधान अवताडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. त्याच बरोबर अवताडे यांच्याकडून यावेळी सढळ हाताने ‘ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनाही “रसद” पुरवली गेली’ त्यामुळेच पंढरपूर शहर आणि 22 गावात अवताडे यांना मोठी मजल मारता आली.

भारत भालके यांच्या बालेकिल्ल्यावर लक्ष ठेऊन अवताडे यांनी त्या भागात अधिक प्रमाणात ” हात मोकळा ” केला त्यामुळेच भालके यांच्या बालेकिल्ल्यात ही राष्ट्रवादी ला अपेक्षेनुसार मतदान झाले नाही. उलट भालके हे आपल्या पारंपारिक मतदारांना गृहीत धरून अधिक परीचारकांच्या लोकांची “आतून” मदत मिळेल या आशेवर गाफील राहिले. त्यामुळेच त्यांना पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात मोठे मताधिक्य मिळेल असे अपेक्षित असताना सुमारे 900 मतांनी पिछाडीला जावे लागले.इथेच भालके यांच्या हातून निवडणूक निसटली होती.

मात्र मंगळवेढा तालुक्यातील जनतेने भारत भालके यांनी केलेल्या विकास कामांची जाणीव ठेवली आणि भूमिपुत्र चा भावनिक मुद्दा रेटूनही समाधान अवताडे यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नाही.मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात 2019 च्या तुलनेत अवताडे यांचे मताधिक्य घटले आहे. त्या तालुक्यातही अवताडे यांच्या “लक्ष्मी” ने मोकळ्या हाताने दान दिले. तरीही मंगळवेढा तालुक्यातील जनतेने भारत भालके यांच्या केलेल्या विकास कामावर मतदान केले आणि त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमातून उतराई होत त्यांना मतदान रुपी श्रद्धांजली वाहिली.

भालके यांना पंढरपूर तालुक्यातच झटका बसला असून इथे परिचारक आणि पैसे प्रभावी ठरल्याचे दिसून आले. दोन मोठ्या शक्ती आणि सोबत धनशक्ती एकत्र असूनही राष्ट्रवादी काँग्रेस ला मिळालेली 1 लाख 5 हजारांवर मते ही भारत भालके यांच्या विषयी जनतेत असलेली सहानुभूतीच असल्याचे सिद्ध झाले आहे. उलट भाजपला साम, दाम, दंड,भेद वापरूनही चमकदार यश मिळाले नाही. आणि हा घासून पदरात पडलेला विजय भाजपच्या नेत्यांचे मनातून “समाधान” करणारा नाही हेच दिसून आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात हजेरी लावली आणि त्यावरच समाधान विजयाचे गणित पक्के समजून धूम ठोकली. तरीही बलाढ्य आर्थिक आणि राजकीय ताकदीसमोर नवख्या उमेदवाराने, तळागाळातील कार्यकर्त्यांनी पदरमोड करून केलेले कष्ट वाया गेले.मात्र एकाकी लढूनही मिळालेली 1 लाख 5 हजाराहून अधिकची मते राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्याना पुढच्या काळात अधिक नेटाने उभा राहण्यास प्रेरक ठरणार आहेत असे दिसते.

One thought on “राष्ट्रवादीला फाजील आत्मविश्वास नडला

  1. राष्ट्रवादी वर असलेल्या प्रेमापोटी हा लेख आलाय का संपादक साहेब 😂😂 पंढरपूरात एकही निःपक्ष पत्रकार राहीला नाही…

Leave a Reply

error: Content is protected !!