राष्ट्रवादी च्या बैठकीत झाला निर्णय
टीम : ईगल आय मीडिया
जो पर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय संपत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रत्येक नेत्याला एक जिल्हा याप्रमाणे जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे, महामंडळांवरील नियुक्त्यांचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आग्रह धरला गेला आहे. पुढच्या १५ दिवसांत ही नावे जाहीर केली जातील, अशी माहिती कामगार मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीबाबत नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.
खा. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य मंत्री आणि नेते उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाचे मंत्री, पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या कामाबाबतचा या बैठकीत आढावा घेण्यात आला तसेच पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच्या ध्येयधोरणांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली, बैठकीबाबत नवाब मलिक यांनी अधिक तपशील दिला. बैठकीत सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना संपर्क मंत्र्यांवरील जबाबदारी वाढवण्यात आली आहे.