तूर्तास धनंजय मुंढे यांना अभय !

राष्ट्रवादी च्या कोअर कमिटीचा निर्णय : मुंढे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही

मुंबई : ईगल आय मीडिया

रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास अभय मिळाले आहे. रेणू शर्मा ही महिला ब्लॅकमेलर असल्याचे समोर येत असल्याने लगेचच त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळं मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात भाजपच्या कृष्णा हेगडे पोलिसात तक्रार दिली तर मनसेचे मनीष धुरी यांनी देखील तिच्यावर आरोप केले. त्यामुळं ही महिलाम ‘ब्लॅकमेलर’ असल्याचं समोर आलं. काल रात्री उशिरा झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चिला गेला.

रेणू शर्मानं मुंढे यांच्याविरोधात केलेली तक्रार व मुंडे यांच्या खुलाशानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दुसऱ्या पत्नीची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा होती.

मात्र, चर्चेअंती मुंडे यांचा राजीनामा घाईघाईनं न घेण्याचा निर्णय झाला, असे सूत्रांकडून समजते. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पक्षाच्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचं समजतं. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!