जिल्ह्यातील नेत्यांशी खा.पवारांचे गुफ्तगू

जानकरांच्या लग्नाला खा.पवारांची उपस्थिती

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आज माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर अचानक आले होते. राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या मुलाच्या विवाहासाठी उपस्थिती लावल्यानंतर खा. पवारांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांसोबत सुमारे 30 मिनिटे चर्चा केली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर प्रथमच खा.पवार सोलापूर जिल्ह्यात आले होते आणि जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांशी आज त्यांनी चर्चा केली.

राष्ट्रवादी चे नेते उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा विवाह जत येथील सुभाषराव माने -पाटील यांची कन्या स्नेहल यांच्याशी आज झाला. या निमित्त वधू-वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी खा. पवार आज वेळापूर ( ता.माळशिरस ) येथे आले होते. दुपारी अडीच वाजता हेलिकॉप्टर ने खा. पवारांचे वेळापूर येथे आगमन झाले. जानकर यांच्या घरीच साधेपणाने विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास फक्त राजकीय क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित होते. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन जानकर यांनी मोजक्याच 50 निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकून घेतला.

त्यानंतर खा. पवारांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांशी सुमारे 30 मिनिटे चर्चा केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आम.बबनराव शिंदे, आ.यशवंत माने, आ.संजयमामा शिंदे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आम. दीपक साळुंखे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, जि प सदस्य बाळराजे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी चे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचा पराभव, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, जिल्ह्यातील कोरोना ची परिस्थिती याचबरोबर साखर कारखानदारी बाबत चर्चा झाल्याचे समजते. बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर खा. शरद पवार दीर्घ काळानंतर सोलापूर जिल्ह्यात आले आणि जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

error: Content is protected !!