सांगोला दौरा : दिवंगत देशमुख यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
टीम : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. पवार यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आम.यशवंत माने, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी खा.पवारांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच देशमुख कुटुंबीय, दिवंगत देशमुख यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली.
तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं. दिवंगत गणपतराव देशमुख आणि खा.शरद पवार यांचे खूप स्नेहाचे संबंध होते. खा. पवारांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणूनही गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जायचे.
1978 साली शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये गणपतराव देशमुख हे मंत्री होते. तेव्हापासून त्यांचे आणि पवारांचे राजकिय आणि कौटुंबिक स्नेह संबंध आहेत. खा.पवार यांच्या गणपतराव देशमुख यांच्यावरील प्रेमापोटी 1999 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसने सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. त्याचबरोबर पवारांच्या सोबत असलेल्या मैत्री खातर दिवंगत देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यात खा.पवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार केला आहे.
2009 साली खुद्द शरद पावर माढा लोकसभेसाठी उभा राहिल्यानंतर सांगोला विधासभा मतदारसंघात आ.देशमुख यांनी जीवाचे रान करून पवारांना 35 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली होती. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या विजयासाठी दिवंगत देशमुख यांनी दिवस – रात्र एक केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही राष्ट्रवादी च्या उमेदवारासाठी दिवंगत देशमुख यांनी वयमान विसरून प्रचार केला होता आणि मतदारसंघात मताधिक्य मिळवून दिले होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी च्या दीपक साळुंखे यांच्या गटाने आ. देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांच्या विरोधात काम केल्याने शरद पवार दीपक साळुंखे यांच्यावर नाराज असल्याचे आजही दिसून येते. खा.पवार आणि देशमुख यांच्यातील मैत्रीचे विश्वासाचे आणि सहकार्याचे नाते एवढे घट्ट होते. त्यामुळे गणपतराव देशमुख यांच्या निधनाने खा.पवार यांनाही मोठे दुःख झाले असून याच दुःखातून देशमुख कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी खा.पवार यांचा आजचा सांगोला दौरा आहे.
गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आले होते. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि गणपतराव देशमुख यांच्या आठवणीना उजाळा दिला. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.