राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची कासेगावच्या बैठकीत एकमुखी मागणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विधानसभा पोटनिवडणूकित ज्यांनी पक्ष विरोधी काम केले आणि पक्षाच्या उमेदवारास पाडले, जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी करून पक्षाचेच नुकसान करीत आहेत अशा लोकांना पक्षातून काढून टाका अशी एकमुखी मागणी करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कासेगाव येथील कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जेष्ठ नेते कल्याणराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, माजी जि प सदस्य चंद्रकांत बागल, माजी नगराध्यक्ष सुभाष पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदिप मांडवे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभा पोटनिवडणूकित पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर केला. तसेच हेच पदाधिकारी आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर टीका करून पक्षाला अडचणीत आणत आहेत असाही आरोप करण्यात आला. या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत एकुजुटीने काम करून पोटनिवडणूकितील पराभवाचा बदला घ्यावा अशीही भावना अनेकांनी बोलून दाखवली.
सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी यावेळी येत्या काही दिवसात विठ्ठल सहकारी आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक प्रश्न सुटतील आणि सर्व काही सुरळीत चालू होईल, आम्ही त्यासाठीच प्रयत्न करीत आहोत, अशी ग्वाही दिली. तसेच विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.
तर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी विधानसभा पोटनिवडणूकित कोणी कोणी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला असून ज्यांनी पक्ष्याच्या विरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई होईल, मात्र पुढच्या काळात सर्व निवडणुकांत एकजुटीने काम करावे असेही आवाहन केले.
यावेळी लतीफ तांबोळी, पदवीधर आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, समाधान फाटे, आप्पासाहेब थिटे, पक्षाचे तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे, मारुती पोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.