वीर 98 तर भाटघर 85 टक्के
टीम : ईगल आय मीडिया
निरेच्या खोऱ्यातील दुसऱ्या क्रमांकाचे (11.70टीएमसी ) मोठे असलेले निरा देवघर धरण आज सकाळी 100 टक्के भरले असून धरणातून 2233 क्यूसेक्स विसर्ग दुपारी 12 वाजता सुरू करण्यात आलेला आहे. दरम्यान, नीरा उजवा कालवा प्रशासनाने नीरा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
नीरा-देवघर धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आज दुपारी 12 वाजता निरा देवघर धरण 100 टक्के भरले आहे. धरण परिसरातील पावसाचं प्रमाण व पाण्याची आवक वाढली असल्याने पाणी पातळीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाच्या विद्युत गृहातून 750 कुसेक्स व सांडव्यावरून 1482 क्युसेक्स असा 2232 क्युसेक्स विसर्ग निरा नदीत सोडला आहे.
त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील सर्वात मोठे असलेले भाटघर धरण 85.48 टक्के भरले आहे तर वीर धरणात 98.21 टक्के पाणीसाठा झालेला आहे. गुंजवणी धरण 91 टक्के भरले असून नाझरे हा लघु प्रकल्प 27 टक्के भरलेला आहे. गेल्या 20 दिवसात नीरा खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच धरणांतील पाणी पातळी वेगाने वाढली आहे.
मात्र पूर नियंत्रण करण्यासाठी वीर धरणातून वारंवार पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अजूनही नीरा खोऱ्यातील महत्वाची 2 धरणे 100 टक्के भरलेली नाहीत. पुढील पावसाचे प्रमाण आणि साठवणक्षमता लक्षात घेऊन नीरा नदीला कधीही विसर्ग सोडला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा सर्वांना देण्यात आला आहे.