डी तीन मधून तिसंगी लाभक्षेत्रास पाणी सोडण्यावर सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
team : eagle eye news
नीरा उजवा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, या हंगामातील एकच पाणीपट्टी भरून घेऊन १३ मार्चपासून नीरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरु करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान ऐन उन्हाळ्यात कालव्यास पाणी सोडण्यात येणार असल्याने तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व पाण्याचे सिंचन नियोजन करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी आ. समाधान अवताडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनीही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नीरा उजवा कालवा D3 मधून तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रातील गादेगाव, वाखरी, शिरढोण, कौठाळी, भंडीशेगाव साठी आणि वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव, बोहाळी, कोर्टी, गादेगाव या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली.
त्याचबरोबर लाभक्षेत्रातील रांजणी, एकलासपूर, कासेगाव, अनवली खर्डी, तनाळी, तावशी व तपकीर शेटफळ या गावांमध्ये टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येत्या १३ मार्च पासून उन्हाळी पाणी आवर्तन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेश हि करण्यात आले असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.
या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.दत्तात्रय भरणे, आ. शहाजी पाटील, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, आ.रवींद्र धंगेकर, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील, दीपक साळुंखे, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, उप अभियंता अमोल मस्के, शाखा अभियंता धनंजय कोकरे आदी उपस्थित होते.