पुढील वर्षी पालख्या नवीन महामार्गावरून आणण्याचे उद्दिष्ट : पंढरपूर तालुक्यातील टप्पा ते वाखरी काम 50 टक्के पूर्ण
50 टक्केपेक्षा अधिक मुरूमिकरण पूर्ण झाले आहे.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मोहोळ – पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 965 म्हणजेच पालखी महामार्गाचे काम सध्या अतिशय वेगाने सुरू असून पंढरपूर ते टप्पा या मार्गावर काही ठिकाणी आता खडीकरण सूरु झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन पुढील वर्षी पालखी सोहळा नवीन महामार्गावरून पंढरीत येणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पालखी महामार्गावर काही ठिकाणी खडीकरणाचे काम सुरू झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चे काम सध्या गतिमान करण्यात आलेले आहे. महामार्गासाठीचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. ओढे, नाले, कालवे यांचे पूल उभारणे सुरू असून वाखरी बाह्यवळण ते पिराची कुरोली मार्गावरील बहुतांश भागात मुरुमीकरणही पूर्ण झाले असून काही ठिकाणी खडीकरण सुरू झाले आहे. पुढील वर्षी आषाढीला येणाऱ्या पालखी सोहळ्याचा प्रवास नवीन पालखी महामार्गावरून व्हावा हे उद्दिष्ट ठेऊन कामाला गती देण्यात आली आहे. :- सचिन ढोले,
प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी,
मोहोळ – पंढरपूर -पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 च्या प्रत्यक्ष कामाला मागील 4 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. 45 मीटर रुंदीच्या या विस्तारित महामार्गासाठी मोहोळ – पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली पर्यंत आवश्यक तिथे भूसंपादन सुरू आहे. या साठी आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोहोळ पासून पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली पर्यंत महामार्गाचे प्रत्यक्ष काम विना अडथळा सुरू झालेले आहे.
विशेषतः वाखरी बाह्यवळण ते पिराची कुरोली या मार्गाचे काम येत्या 8 ते 10 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन कामाला गती देण्यात आली आहे. या मार्गावरील वीज वाहिन्या स्थलांतर करणे, कालवे, नाले, ओढे यावरील छोटे पूल उभारणे ही कामे गतीने सुरू आहेत. बहुतांश मार्गावर खोदकाम सुरू असून माती उचलून मुरूम भरण्याचे काम 50 टक्केपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचे दिसत आहे. तसेच काही ठिकाणी मुरुमीकरण पूर्ण करून खडीकरणाचे कामही सुरू झालेले आहे.
या मार्गावरील आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण झाली असून भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वाद – विवाद सोडवून भूसंपादन प्रक्रिया वेगाने पार पाडत आणली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कामातही त्यांचे लक्ष असून पुढील वर्षी येणारा पालखी सोहळा नवीन महामार्गावरून यावा या निर्धाराने त्यांनी कामाला गती दिल्याचे दिसून येते.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह बहुतांश पालख्या याच मार्गाने येतात सुमारे 6 ते 8 लाख वारकरी आणि हजारो वाहने यांच्यासाठी सध्याचा पालखी मार्ग खूपच कमी पडतो त्यामुळे या महामार्गाचे काम शासनाने प्राधान्य क्रमाने हाती घेतले आहे. यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा ऐतिहासिक दृष्टीने रद्द झाला आहे. तसेच लॉक डाऊनमुळे पुरेशी रहदारी या मार्गावर नव्हती त्यामुळे गेल्या 4 महिन्यात या पालखी मार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू असून पुढच्या वर्षी येणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वागत प्रशस्त आशा पालखी महामार्गावर केले जाईल असे दिसते.