राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना वाखरी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा पाईप लाईन फोडली

वारीच्या तोंडावर पाणी पुरवठा विस्कळीत

पंढरपूर : eagle eye news

आषाढी यात्रेसाठी निघालेला पालखी सोहळा १५ दिवसांवर आलेला असताना वाखरी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना गावची पाणी पुरवठा पाईप लाईन फोडण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पाईप लाईन उघडी पडल्याचे आणि फुटल्याचे दिसत असतानाही ठेकेदाराने काम थांबवले नाही किंवा पाईप लाईन फुटणार नाही याची काळजी न घेताच काम सुरु ठेवले आहे.

पालखी महामार्ग बायपास ते पंढरपूर शहर या विस्तारित पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. वाखरी येथील लोखंडे वस्ती परिसरात जुन्या रस्त्याचे खोदकाम करताना बाजूने गेलेली वाखरी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा लाईन जागोजागी फुटलेली आहे. सुमारे ३०० फुटांपेक्षा अधिक लांब हि पाईप लाईन उघडी पडली असून बहुतांश ठिकाणी ती फ़ुटलेलीही आहे. त्यामुळे गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. सोमवारी गावात पाणी पुरवठा करता आलेला नाही.

येत्या १५ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह शेकडो पालख्या, हजारो दिंड्या आणि ५ लाखांहून अधिक वारकऱ्यांचा वाखरीत अखेरचा मुक्काम आहे. त्यामुळे या भाविकांना पाणी पुरवठा वाखरी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेतूनच केला जातो. राष्ट्रीय महामार्ग काम करताना हि पाईप लाईन फोडल्याने ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे, अन्यथा पालखी सोहळ्याचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!