वीर धरणात सर्वाधिक 50 टक्के पाणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पावसाळ्याला सुरुवात होत असतानाच यावर्षी नीरा खोऱ्यात 18 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. खोऱ्यातील 4 पैकी वीर धरणात तब्बल 49 टक्के इतका पाणी साठा असल्याने यंदा निरेच्या लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन अगदी वेळेवर झाले असून येतानाच मान्सून बरसत आलेला आहे. गेल्या वर्षी विक्रमी पाऊस झाल्याने नीरा खोऱ्यात नद्यांसह अगदी ओढे,नाल्यानाही पूर आलेला होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील भूजल पातळी उंचावली आणि त्याचा परिणाम म्हणून धरणातील पाण्यावर नेहमी प्रमाणे ताण आला नाही. यंदाच्या वर्षात नीरा खोऱ्यातील पाण्यासाठी एकही आंदोलन झाले नाही की पाणी वाटपाच्या तक्रारीचे साधे निवेदन ही कुणाचे आले नाही. यंदाचा उन्हाळा शेतीला आणि शेतकऱ्यांना ही अतिशय सुखकर गेलेला आहे.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. गतवर्षी प्रमाणे यंदाही मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे. आणि मान्सूनपूर्व पावसानेही नीरा खोऱ्यात हजेरी लावली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणातील पाण्याची पातळी खालावलेली असते. वीर धरणातील उपयुक्त पाणी साठा संपलेला असतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी नीरा खोऱ्यात उपयुक्त पाणी साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी नीरा खोऱ्यात 26 टक्के पाणी साठा होता. यंदा हा साठा 18 टक्के इतका आहे. गेल्यावर्षी पेक्षा केवळ 8 टक्के पाणी साठा कमी असला तरी वीर धरणात यंदा तब्बल 49.84 टक्के इतका पाणी साठा आहे. सध्या धरणातून उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यात सुमारे 2 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले जात आहे. यंदाही अपेक्षित पाऊस होईल असे हवामान विभागाने भाकीत केले आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा नीरा खोऱ्यातील पाणीसाठा समाधानकारक राहील असे दिसते.