आम.परिचारक – अवताडेंची मागणी बेदखल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक आणि विधानसभा सदस्य समाधान अवताडे यांनी पंढरीतील नियोजित संचार बंदी शिथिल करण्याची मागणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रास प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येते. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संचारबंदी कमी करता येणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असलेल्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरात 17 ते 25 जुलै दरम्यान कडक संचारबंदी जाहिर केली आहे. मात्र ही 7 दिवसांची संचारबंदी पंढरपूर च्या नागरिकांसह व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी ही अन्यायकारक असल्याची व ती 19 ते 21 असे 3 दिवस करण्याची मागणी आम. प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
त्यांच्या या मागणीचा शासनाने कसलाही विचार केला नसल्याचे दिसून आले. आज पंढरपूर येथे आषाढीच्या बैठकीसाठी आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संचारबंदी कमी करण्याची शक्यता फेटाळून लावली.

संचारबंदी कालावधी कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. आषाढीसाठी पालखी सोहळे 19 जुलै रोजी येत आहेत. 17 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यानंतर संचारबंदी लागू करीत आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने तिचा प्रभाव 18 जुलै पासून लागू होईल. पालख्या येण्याच्या अगोदर एक दिवस संचारबंदी अमलात येईल. तसेही एक दिवस ती निष्प्रभ आहे. आणि 25 जुलै पर्यंत पालख्या पंढरीत असल्याने त्या तारखेपर्यंत ती लागू राहील, असेही सातपुते यांनी सांगितले.
यावरून 17 ते 25 जुलै एवढ्या दीर्घकाळ असलेली संचारबंदी शिथिल करण्याची परिचारक अवताडे यांनी केलेली मागणी प्रशासनाकडून बेदखल करण्यात आल्याचे दिसून येते.