विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण : आ दत्तात्रय सावंत

फोटो : मुंबई येथे विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा संरक्षणाचा जीआर शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडून घेताना आ दत्तात्रय सावंत, आ श्रीकांत देशपांडे, आ बाळाराम पाटील आदी

करकंब : ईगल आय मीडिया

विद्यार्थी संख्या कमी झालेली पदे कमी करून शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते, शासनाकडे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्यावर आज सन २०१३-१४ मधील मंजूर पदांच्या मर्यादेत पुढील वर्षी पद कमी झाले त्या शाळेत पुन्हा पटसंख्या वाढल्याने पद मंजूर करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांस कार्यरत करून सेवा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आ. दत्तात्रय सावंत यांनी दिली.

राज्यामध्ये अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवेचे संरक्षण दिले जात होते, परंतु विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना मात्र सेवा संरक्षण दिले जात नव्हते त्यांच्या सेवा संरक्षणासाठी आमदार दत्तात्रय सावंत,आ श्रीकांत देशपांडे व आ बाळाराम पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने बरेच दिवस मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाल्याने शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित होते. मंत्रालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आ. दत्तात्रय सावंत हे मंत्रालयात थांबून प्रश्न मार्गी लावत आहेत, शिक्षक आमदार सावंत यांनी सेवा संरक्षणासाठी मंत्रालयीन स्तरावर सतत पाठपूरावा करुन आज सेवासंरक्षणाचा आदेश घेवून राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल राज्यभरातून विना अनुदानित व अंशतः विना अनुदानित शाळेतील शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


विना अनुदानित शिक्षकांचे समायोजन व्हावे

अनुदानित शाळेतील शिक्षक जर अतिरिक्त झाला तर त्याचे समायोजन रिक्त जागा असणाऱ्या दुसऱ्या अनुदानित शाळेवर केले जाते त्याप्रमाणे विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षक अतिरिक्त होत असेल त्याचे ही समायोजन विना अनुदानित शाळेवर किंवा अंशतः अनुदानित शाळेवर करण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!