ट्रक ने ओम्नी उडवली : 3 जण ठार ; 9 जण जखमी

सांगोला : ईगल आय मीडिया

 सांगोला तालुक्यातील करांडेवाडी फाटा नजीक ओमनी कार व मालट्रकचा अपघात होऊन तीन जण ठार तर नऊ जखमी झाले आहेत. हा अपघात १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मात्र २ ऑगस्ट रोजी सांगोला पोलिसात याची नोंद झाली आहे. माणिक शिंगाडे ( रा.उदनवाडी ता.सांगोला) यांनी या बाबत सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे भाऊ दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे ओमनी चालक म्हणून काम करत होते. दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओमनी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे ओमनी (एम.एच. १२-एच.एफ.९६०४) या वाहनामध्ये उदनवाडी ( झापाचीवाडी , ता.सांगोला ) येथून ०३ पुरुष , ०३ महिला , ०५ लहान मुली व ०१ लहान मुलगी असे घेऊन सिंदगी (कर्नाटक) याठिकाणी घेऊन जात होते. करांडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलाजवळील उजव्या बाजूस असणाऱ्या सर्व्हीस रोडने ओमनी कार जात असताना समोरुन येणाऱ्या मालट्रक (एम.एच.१३ – सी. यु. – ६० ८६ ) ने ओमनी कारला समोरुन धडक दिली.

 या अपघातात ओमनी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (वय ४२ वर्षे रा.उदनवाडी ता.सांगोला), यासह ओमनी मधील प्रवासी कावेरी मनोज हरीजन ( वय ७ वर्ष रा. निरलगी ता. ताळेकोटी जि. विजापूर,)  गुडडी चंद्रकांत मगीरी ( वय ८ वर्षे रा. कोंडगोडी ता. जेवरगी जि. गुलबर्गा ) अशी  मयत झालेल्याची नावे आहेत. तर मनोज हरिजन (वय ४०) ,भरती मनोज हरिजन (वय ३० दोघे रा. निरलगी ता. ताळेकोटी जि. विजापूर ) चंद्रकांत मगीरी (वय २५), दीपा मानवेश मगीरी (वय १६) ,लक्ष्मी मगीरी (वय ०६), ताराबाई चंद्रकांत मगीरी (वय ३०) , अंबिका मानवेश मगीरी (वय २८), मुत्तूराज चंद्रकांत मगीरी (०२), चिन्नू चंद्रकांत मगीरी (वय ०५ , सर्व रा. कोंडगोडी ता. जेवरगी जि. गुलबर्गा) अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.

 या घटनेनंतर सदर मालट्रकचा चालक हा त्याच्या ताब्यातील मालट्रक तेथेच सोडुन पळून गेला असून याप्रकरणी अज्ञात मालट्रक चालका विरोधात सांगोला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!