एकच पक्ष, एकच झेंडा, एकच विचार

शेकापचे शिलेदार गणपतराव देशमुख 54 वर्षाहून अधिक काळ एकाच पक्षाचे आमदार 

सांगोला : ईगल आय मीडिया


5 वर्षात 5 पक्ष, आणि 10 नेते बदलण्याच्या जमान्यात ही
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांनी पहिल्यापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत एकच पक्ष, एकच झेंडा एकच विचार यावरील निष्ठा जपली. आजच्या काळात ही तत्व विचार आणि आचार निष्ठा अतिशय दुर्मिळ झाली आहे. त्यामुळेच गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाबद्दल नव्या पिढीला ही आदर होता.

पुण्यात विध्यार्थी दशेत असताना त्यांच्यावर शेकापचे मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले. निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले.

आबा हे १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. आपल्या पहिल्याच आमदारकीच्या अभिभाषणावर भाषण देऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचीदेखील वाहवा मिळविली होती. 54 वर्षाहून अधिक काळ त्यांनी शेकाप या एकमेव पक्षाकडून विधानसभेत नेतृत्व केले. . या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व एकाच शेतकरी कामगार पक्षातून सिद्ध  केले.

 शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणारा शेकाप कधीही सत्तेत येऊ शकत होता. शंकरराव मोरे, नाना पाटील, सी. डी . देशमुख, केशवराव जेधे, भाई माधवराव बागल, तुळशीदास जाधव अशा मातब्बरांचा शेकाप हा एकेकाळचा पक्ष. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर सर्वात महत्वाचा शेकाप हा पक्ष होता.

सोलापूर जिल्ह्यात सुद्धा माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर या तालुक्यात एकेकाळी शेकापचा दबदबा होता. पण त्यानंतरच्या काळात पक्षाची उतरण सुरु झाली, हळूहळू पक्ष संपल्यात जमा झाला. आ. जयंत पाटलांमुळे रायगड आणि गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोल्यात शेकापचे अस्तित्व राहिले. त्यातही १९६२ नंतर महाराष्ट्रात झालेल्या इतक्या मोठ्या राजकीय उलथापालथीमध्ये गणपतराव लाल बावटाबरोबर प्रामाणिक व निष्ठेने राहिले.  ही निष्ठा एवढी गहरी होती की, 2003 साली राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारमधून शेकाप बाहेर पडला आणि गणपतआबांनी लगेचच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही गणपत आबांचा सक्रिय सहभाग होता. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. शेकापच्या विचारातील साधेपणा त्यांच्या जगण्याचा भाग होता. म्हणूनच ते बहुतांश वेळा एसटीने प्रवास करत होते. प्रचारासाठी गावोगावी गेले की, तिथेच कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करीत होते.


  ११ वेळा आमदार होऊनसुसुद्धा त्यांच्या डोक्यात आमदारकी गेली नाही म्हणूनच त्यांनी हे शक्य करून दाखविले. पाय जमिनीवर असण्याची कला व साधेपणा या कारणामुळे लोकांनी त्यांना सातत्याने भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, संसदीय अभ्यासामुळे, विचार निष्ठेमूळे आबांचा आदरयुक्त धाक प्रशासन आणि मंत्रिमंडळावर होता. जनतेच्या हितासाठी, संस्थेसाठी म्हणत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना आबाची एकनिष्ठता आणि दरारा अनुकरणीय आहे. एक विरोधीपक्षात राहुनदेखील कामे होऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!