मोहोळ : ईगल आय मीडिया
चिखली ( ता. मोहोळ ) येथील एक इसम शुक्रवारी सोलापूर येथे कोरोना बाधित आढळला. त्यामुळे मोहोळ तालुक्याचा धोका आणखीन वाढला असून मोहोळ तालुका प्रशासनाने नजीक पिंपरी येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ९ जणांना क्वॉरंटाईन केले आहे.
मोहोळ तालुक्यातील चिखली येथील एका इसमास किडनीचा आजार आहे. त्याच्या उपचारासाठी तो १२ जून रोजी सोलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याठिकाणी त्याला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी १९ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरुटकर यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक चिखली गावात दाखल झाले. यावेळी त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांना तालुका प्रशासनाने क्वॉरंटाईन केले असून त्यांची रवानगी नजीक पिंपरी येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये केली आहे.
कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने प्रशासनाकडून तालुक्यात पुन्हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिखली गावातील त्या कोरोना बाधित रुग्णाच्या घरापासून पाचशे मीटर अंतर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तर एक किलोमीटरचा परिसर बफर झोन करण्याची कार्यवाही सुरू आहे.