दरड कोसळण्याची आणखी एक दुर्घटना : 12 जण ठार

टीम : ईगल आय मीडिया

आंबेघर ( ता.पाटण,जि. सातारा ) या गावात दरड कोसळली असून या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.


आंबेघर येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे समोर येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेरघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. सध्यस्थितीत मिरगाव येथील एक व्यक्ती, रेगंडी (ता. जावली) येथील दोन, कोंढावळे (ता. वाई) येथील दोन, जोर येथील दोन धावरी येथील एक अशा आठ जणांचा बळी गेला आहे. जोर (ता.वाई )येथील दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. जावली तालुक्यातील रेंगडी गावात दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आणखी दोन व्यक्ती बेपत्ता आहेत. कोंढावळे (ता. वाई) येथील पाच घरे मातीच्या ढिगा-यात दबलेली गेली. त्यातील २७ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. आतापर्यंत आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. एकूण 15 घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं. 

दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!