हेलिकॉप्टरने जाणार माउली आणि तुकोबांच्या पालख्या : पुणे जिल्हा प्रशासनाने केली तयारी


पुणे : ईगल आय मीडिया
१ जुलै रोजी साजऱ्या होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॉप्टरने नेण्यात येणार आहेत. एसटी बस आणि विमानाने पालख्या घेऊन जाणे गैरसोयीचे असल्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव योग्य मानून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. त्यास शासनाची परवानगी मिळाल्यास ३० जून रोजी दोन्ही संताच्या पालख्या पंढरीकडे हेलिकॉप्टरने जाणार आहेत.
करोना विषाणूच्या रोगामुळे यंदा देहू,आळंदी आषाढीची पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे लाखो भाविकांसह पंढरीला एव्हाना निघाले असते, परंतु यंदा कोरोनामुळे राज्य शासनाने यात्रा स्थगित केली असून केवळ मनाच्या ७ आणि महत्वावाच्या आणखी २ अशा ९ पालख्यांना परवानगी दिली आहे.
पालखी सोहळ्याची परंपरा खाडीत होऊ नये म्हणून पालख्या विमान, हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे ३० जून रोजी पंढरपूरला नेण्याचे पर्याय तपासले होते. विमानापेक्षा हेलिकॉप्टरने पालख्या नेणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सुचविले आहे. बसने पालख्या नेल्यास मार्गावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने पालख्या नेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विमानाद्वारे पालख्या नेण्याचा मार्ग स्वीकारल्यास लोहगाव विमानतळावरून सोलापूर येथील विमानतळावर पालख्या न्याव्या लागणार आहेत. तेथून पंढरपूरला पालख्या नेण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा बसचा पर्याय निवडावा लागणार आहे. तर बसने पालख्या नेल्यास मार्गावर दर्शनासाठी स्थानिक भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता पालख्या थेट हेलिकाप्टरने पंढरीत नेल्यास योग्य राहील, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १२ जून रोजी; तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १३ जून रोजी ५० भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळे झाले आहेत. पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर यंदा श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमध्ये मुक्कामी असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये आहे. ३० जून रोजी पालख्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
पंढरीच्या वाटेवर तिहेरी पोलीस बंदोबस्त
पंढरीकडे वारकऱ्यांनी येऊ नये म्हणून पंढरीच्या मार्गावर सोलापूर जिल्हा प्रशासनाने तिहेरी पोलीस बंदोबस्त नियोजित केला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर तसेच पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहर अशा आणखी २ ठिकाणी कठोर नाकेबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात बाहेरून येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आलेला आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून दिंड्या आणि भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जाण्यास प्रवास पास दिले जाणार नसल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!