पालखी मार्ग रुंदीकरणाचे काम वेगात


पुढच्या आषाढीपर्यंत जिल्ह्यातील मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता

पंढरपूर : ईगल आय मीडिया
मोहोळ – पंढरपूर – पुणे – देहू – आळंदी या पालखी महामार्गाचे काम वेगात सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात वाखरी ते खुडूस या दरम्यानचे काम पुढील आषाढीपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीने कामाला गती दिलेली दिसून येत आहे.
पंढरपूर – पुणे – देहू – आळंदी या पालखी मार्गावर रहदारी वाढली असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याकरिता पालखी मार्गाचे विस्तारिकरण मोहोळपर्यंत करण्यात आलेले आहे.
तोंडले- बोंडले येथून श्रीपुर, अकलूज मार्गे संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचेही रुंदीरकण होणार असून त्या मार्गावरील सर्व्हेक्षण काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मात्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र 965 म्हणून ही जाहीर करण्यात आलेला आहे. या मार्गावर 3 टप्प्यात रुंदीरकण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी दुसरा टप्पा वाखरी ते खुडूस या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात भू संपादन करावे लागले असून 80 टक्केपेक्षा अधिक संपादन काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असून मार्गाच्या रुंदीकरणास सुरुवात झालेली आहे. सध्या वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली या गावात मार्गावर झाडे यापूर्वीच तोडण्यात आली आहेत. सध्या मुरूम भरण्याचे , विद्युत खांब हलवून नवीन ठिकाणी उभा करण्याचेकाम वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत या मार्गाचे मुरुमीकरण पूर्ण करून पुढील आषाढीपर्यंत हा मार्ग पालखी सोहळ्यास येण्यासाठी सुसज्ज बनवला जाईल असे सांगितले जात आहे.
यंदा आषाढीसाठी पालखी सोहळा येणार नसल्याने काम करताना वारकऱ्यांच्या गर्दीचा कसलाही अडथळा दिसून येत नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!