असं होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं !


संत संग चुकला : पालखी मार्गावरील गावे अचंबित

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आषाढी यात्रा रद्द होईल,संतांचे पालखी सोहळे स्थगित होतील, आषाढी यात्रा भरणारच नाही हे कुणी सांगितलं असतं तर लोकांनी त्याला मूर्खात काढले असते. मात्र प्रत्यक्षात हे घडलं असून कधी तरी हे असं होईल असं स्वप्नातही न आल्याने पालखी मार्गावरील लोक अचंबित झालेले दिसत आहेत.

आषाढी यात्रा म्हटलं की, आठवडाभर अगोदरच पालखी मार्गावर वारकऱ्यांची गर्दी, दिंडीचे थवे, टाळ, मृदंगाचा गजर आणि प्रशासनाची लगबग, नियोजनाची लगीनघाई हे सगळं न चुकता दरवर्षी सुरू असतं. मात्र यावर्षी हे सगळं कुठंही दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी आषाढी यात्रा आणि पालख्याचे आगमन यामुळे पालखी मार्गावरील गावे पालख्या येण्यापूर्वी आठवडाभर गजबजून गेलेली असायची. गावातील नागरिकांकडून घराची स्वच्छता, ग्रामपंचायत कडून गावाची सफाई मोठ्या उत्साहाने सुरू असायची.


साधू संत येती घरा,
तोचि दिवाळी दसरा
हा प्रत्यक्ष अनुभव पालखी मार्गावर दरवर्षी पहायला मिळतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपान काका यांच्यासह शेकडो पालखी सोहळे हजारो दिंड्या आणि 5 लाखाहून अधिक वारकरी दरवर्षी आषाढी यात्रेसाठी या मार्गाने पंढरीला येत असतात. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत प्रशासन जसे प्रयत्न करते तसेच सर्वसामान्य नागरिकही मोठ्या भक्ती भावाने संतांच्या स्वागतासाठी तयारी करीत असतो. दरवर्षी पालख्यांच्या दर्शनासाठी नातेवाईकनाही, सासरी गेलेल्या पोरींनाही निमंत्रणे दिली जातात. आपल्या अंगणात 10 – 20 वारकरी जेवू घालण्यासाठी वेगळी तयारी केली जाते. सार्वजनिक मंडळे, संस्था हजारो वारकर्यांना अन्नदान करण्याचे नियोजन अगोदरच करून ठेवतात.
हे सगळं दरवर्षी आषाढीच्या अगोदर न चुकता होतं, गावातील, घरातील कोणी मयत झालं तरी यात खंड पडत नाही. पालखी मार्गावरील गावांचा हा जीवनक्रम झालेला आहे. आषाढी यात्रा, पालखी सोहळा, दिंड्या, पताका, वारकरी, रस्त्याने जाणारे भाविक, हजारो वाहनांची रांग हे सगळं पालखी मार्गावरील लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मात्र गेल्या 4 महिन्यापासून या मार्गावर सन्नाटा दिसून येतो. चैत्री यात्रा झाली नाही, पाठोपाठ आषाढीसुद्धा होत नाही. पालखी सोहळा गावात येण्याची तिथी दोन दिवसांवर आली असली तरीही गावात मात्र सुतकी वातावरण आहे, ज्याच्या, त्याच्या तोंडी कोरोना, वारी, वारकरी, दिंड्या,पालख्या आणि वारकऱ्यांच्या असंख्य आठवणी घोळत आहेत.
हे असं होईल याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असं कधी होईल असं वाटतही नव्हतं, मागे कधी झालं नाही,पुढं कधी होणार नाही आणि ये सगळं आपणांस पाहावं लागतंय याची सलही पालखी मार्गावरील नागरिक बोलून दाखवत आहेत.

दरवर्षी वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे होणारा मनस्ताप सहन करणारे या मार्गावरील नागरिक सध्याच्या वातावरणामुळे अचंबित झालेले आहेत. आषाढी वारी रद्द होऊ शकते ? यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जाताना दिसतंय.
एकूणच पालखी मार्गावर सध्या कोरोनाची जशी दहशत आहे तशीच संत संगतीला मुकल्याची हुरहूर ही आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!