दुसऱ्या दिवशी आंदोलनास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर : eagle eye news
पांढरेवाडी ( ता. पंढरपूर ) येथे सुरु असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चिखलकर यांनी गावच्या स्मशान भूमीत शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे पांढरेवाडी गावातील हे आंदोलन उग्र स्वरूप घेण्याची चिन्हे दिसत आहे.
पांढरेवाडी गावातील अवैध व्यवसाय बंद करावेत यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, सर्व महिला आक्रमक झालेलया दिसत आहेत. येणाऱ्या काळात हा लढा फार व्यापक आणि आक्रमक होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संबंधित अवैध व्यावसायिक तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा आपला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.बाळासाहेब चिखलकर
उपोषणकर्ते, पांढरेवाडी
पांढरेवाडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू, जुगार असे अवैध व्यवसाय मोठ्ट्या प्रमाणात चालत आहेत. या अवैध व्यवसायामुळे गावातील युवक व्यसनाधीन झालेले आहेत आणि कुटुंबांची वाताहत झालेली आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाच्या विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यापासून करकंब पोलीस ठाण्यापासून ते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यापर्यंत निवेदने दिलेली आहेत.
यापूर्वी करकंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलने केलेली आहेत. काही दिवस दारू विक्री बंद करण्यात आली होती मात्र परत पुन्हा अवैध दारू विक्रीने डोके वर काढले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चिखलकर यांनी गावच्या स्मशान भूमीत आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास संपूर्ण ग्रामस्थांनी पाठींबा दर्शवला आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी गावातील महिलांनी या आंदोलनात सहभाग दर्शवला आहे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली.