पक्ष बीओटी वर चालवायला दिला आहे काय ?

पंढरपूर च्या पदाधिकाऱ्याचा चंद्रकांत पाटलांना मेसेज : तर मंगळवेढ्यात चपला घेऊन एकमेकांवर धावले

पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक आता दुसऱ्या टप्प्यात जात असताना भारतीय जनता पक्षामध्ये धुसफूस वाढीला लागली आहे. पंढरपूर च्या जेष्ठ पदाधिकार्याने थेट चंद्रकांत पाटलांना मेसेज पाठवून पक्ष bot वर चालवायला दिला आहे का ? असा जाब विचारला आहे तर मंगळवेढ्यात पक्ष बैठकीतच कार्यकर्ते चपला घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आतले आणि बाहेरचे हा वाद रंगला आहे. तसेच पूर्वीचे आणि पदांसाठीचे वाद उफाळून येत असल्याचे दिसते.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उद्योगपती समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज ( शनिवार ) अखेरचा दिवस असून आज दुपारनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांची यंत्रणा घरोघरी पोहोचण्यात आघाडीवर आहे, स्वतः भगीरथ भालके, त्यांचे बंधू व्यंकट भालके, भगीरथ यांच्या पत्नी डॉ. सौ.प्रणिता भालके यांनी बैठका, कोपरा सभा, घरोघरी जाऊन गाठी भेटीचा धडाका लावला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन्ही तालुक्यात भगीरथ भालके यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असताना भाजपची यंत्रणा मात्र विस्कळीत आहे.

अवताडे आणि परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेळ बसलेला नाही. अनेक गावांत अजूनही अवताडे यांची यंत्रणा कामाला लागली नाही. प्रचाराचा नारळ फोडला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसत नाही. हे कमी म्हणून की काय गेल्या दोन दिवसांत जुने आणि नवे कार्यकर्ते असा वाद रंगला आहे. पक्षाचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीत फडकवत ठेवणारे जेष्ठ, जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते या प्रचारापासून दूर आहेत. त्यांना साधी विचारणा ही झालेली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांतुन संताप व्यक्त होत आहे.

याच संतापाच्या भरात जेष्ठ पदाधिकार्याने थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मेसेज पाठवून ‘ पक्ष बीओटी वर चालवायला दिला आहे काय ?’ असा जाब विचारला आहे. यावरून निष्ठावान आणि जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांमध्ये किती तीव्र नाराजी पसरली आहे याची कल्पना येते. मंगळवेढा येथे ही भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये धुसफूस आहे. बुधवारी अवताडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत दोन कार्यकर्ते चपला घेऊन एकमेकांच्या अंगावर धावल्याचे दिसून आले.

यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेदवार समाधान अवताडे उपस्थित होते. तरीही या बैठकीत पदावरून कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. या प्रकरणाची मंगळवेढ्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो. इथं कार्यकर्ते पक्षाचा आदेश मानून काम करतात ही परंपरा सांगितली जाते मात्र, पंढरपूर, मंगळवेढा भाजपमध्ये धुसफूस वाढीला लागली असल्याने अनेक पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त आहेत असे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!