पंढरपूर पोटनिवडणुकीत आज भाजपला बसणार धक्के ?

अनेक आजी – माजी नगरसेवक करणार राष्ट्रवादी प्रवेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टीला अनेक धक्के बसण्याची शक्यता असून पंढरपूर शहरातील जवळपास चार नगरसेवक आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आता प्रचार दोन दिवस उरले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मध्ये चुरशीची लढत होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत पंढरपूर मध्ये भारतीय जनता पार्टीला धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेमध्ये भाजपचे किमान विद्यमान चार आणि काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांसह संबंधित नगरसेवक यांची वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली आहेत असे समजते.

आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत असलेल्या जाहीर प्रचारसभेत शहराच्या अनिल नगर भागातील एक नगरसेवक, मध्यवर्ती परिसरातील एक नगरसेवक आणि उपनगर भागातील 2 नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चारही नगरसेवकांचा त्यांच्या समाज गटामध्ये मोठा प्रभाव असल्याने मोठ्या मतदानाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आज संध्याकाळी होत असलेल्या सभेकडे पंढरपूर शहराचे लक्ष लागले असून, आज होणारी सभा पंढरपूर शहरातील या निवडणुकीतील राष्ट्रवादीची शेवटची आणि मोठी सभा ठरणार आहे. या शेवटच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे महत्वाचे प्रवेश होत आहेत.

त्याशिवाय इतरही आणखी काही भाजपचे पदाधिकारी यांचाही प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आज प्रवेश करणारे ते नगरसेवक कोण आहेत याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!